Jalgaon News : जळगावच्या एरंडोलमध्ये आज बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) एका अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून काही नमुने ताब्यात घेतले असून, हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
एरंडोल तालुक्यातील पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका गुराखीला अंदाजे ३० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांसह पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आदी अधिकारी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून काही नमुने ताब्यात घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पाठवण्यात आला असून, अधिक तपासासाठी पोलिसांची विविध पथके तत्काळ रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
खून करून पुरावा नष्ट केल्याचा संशय
ज्वलनशील पदार्थाचा वापर करून मृतदेह जाळण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, महिलेची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)










