12th Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उद्या मंगळवारी (दि.10 फेब्रुवारी) पासून 12वी तर दि. 20 फेब्रुवारीपासून 10 वीच्या परिक्षा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
परीक्षांचे वेळापत्रक
12वीच्या परीक्षा उद्या मंगळवारी, 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान, तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेतल्या जाणार आहे.
परीक्षार्थी संख्या
जळगाव जिल्ह्यात 10वी परीक्षेसाठी 147 परीक्षा केंद्रांवर एकूण 59 हजार 420 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यामध्ये 33 हजार 653 मुले व 25 हजार 767 मुली आहेत. तर 12वी परीक्षेसाठी 82 परीक्षा केंद्रांवर एकूण 48 हजार 232 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचे 26 हजार 884, कला शाखेचे 15 हजार 514, वाणिज्य शाखेचे 4 हजार 811 विद्यार्थी असून, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 978 तर आयटीआय अभ्यासक्रमासाठी 45 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
इतर प्रतिबंधात्मक उपाय
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा काळात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी महावितरणकडे सोपविण्यात आली आहे.
तसेच बाह्य उपद्रव टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व पारदर्शक वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)








