Jalgaon Crime News: मुलाला पळवण्याच्या संशयावरून अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील अव्हाणे येथे घडला आहे. या घटनेच जखमी अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान, या तरुणाचा 24 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे मृत्यू झाला.
याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत अनोळखी तरुण हा जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनींग परिसरात सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयास्पदरीत्या फिरत होता. दरम्यान, तो एका तीन वर्षीय बालकाला उचलून घेऊन जात असल्याच्या संशयावरून तिथे जमा झालेल्या जमावाने त्या तरुणाला बेदम मारहाण सुरू केली. याबाबत अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार, पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्याठिकाणी मोठा जमाव आणि अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांनी घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेत जखमी तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार सुरु असताना आज 24 फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खु.), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, सध्या रा. सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.








