Short Film Festival 2026: अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल जळगावात होत आहे. हा फेस्टिव्हल 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी शहरातील कान्ह ललित कला केंद्र, एम.जे. कॉलेज परिसरात संपन्न होत आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून उत्साह शिगेला पोहोचला आहे.
चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रिनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समारोप सोहळा अशा विविध उपक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे. यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या महोत्सवात देशातील 20 राज्यांमधून तसेच विदेशातून शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, कॅम्पस फिल्म व बाल फिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ज्ञ परीक्षकांच्या परीक्षणानंतर निवडक 80 चित्रपटांचे अधिकृत प्रदर्शन दोन दिवसांत करण्यात येणार आहे. देशभरातील सुमारे 300 युवा फिल्ममेकर यानिमित्ताने जळगावात येत असून रसिकांना दर्जेदार लघुपट व माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसराला ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ असे नामकरण करण्यात आले असून स्क्रिनिंग सभागृहांना अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री संध्या व अभिनेत्री प्रिया मराठे यांची नावे देण्यात आली आहेत. 28 रोजी सकाळी 9 वाजता उद्घाटन व स्क्रिनिंगने महोत्सवाची सुरुवात होईल.
दुपारी 11.30 ते 12.30 या वेळेत ‘चित्रपट आणि समाज जागरण’ या विषयावर ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अभिजित गोखले यांचा मास्टर क्लास होणार आहे. दुपारी 3 ते 4 या सत्रात ‘रंगभूमी ते चित्रपटसृष्टी– एक प्रवास’या विषयावर अभिनेते मनोज जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता वंदे मातरम् मुख्य सभागृहात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात येईल. यावेळी मनोज जोशी यांना ‘देवगिरी चित्रतपस्वी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी 7 वाजता टुरिंग टॉकीज सत्रात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट बास्केटबॉल मैदानावर प्रदर्शित केला जाणार असून दिग्दर्शक रसिकांशी संवाद साधणार आहेत.
1 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तिन्ही सभागृहांत चित्रपट प्रदर्शन होईल. सकाळी 11 वाजता ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावर दिग्पाल लांजेकर यांची प्रकट मुलाखत होईल. दुपारी 1 वाजता अभिनेते योगेश सोमण व दिग्दर्शक अतुल गंगवार ‘चित्रपट निर्मिती प्रक्रिया – आव्हाने आणि संधी’ या विषयावर मास्टर क्लास घेतील.
दुपारी 3 वाजता ओपन फोरम सत्रात योफिमा शिष्यवृत्ती विजेते युवा चित्रकर्मी, अभिनेते आरोह वेलणकर व अभिनेत्री सुरभी हांडे युवकांशी संवाद साधतील. सायंकाळी 5 वाजता समारोप सोहळा पार पडेल. यावेळी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून ‘देवगिरी चित्रगौरव’पुरस्कार आरोह वेलणकर व सुरभी हांडे यांना प्रदान करण्यात येईल. तसेच सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, कॅम्पस फिल्म व माहितीपटांना पारितोषिके वितरित केली जातील.










