Bhusawal Murder Case: गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेले भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून एका 42 वर्षीय तरुणाचा सिमेंटची कुंडी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भुसावळ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ऊर्फ पिंटू आत्माराम सावकारे असे मृत तरुणाचे नाव आहे. धक्कादायक असा हा प्रकर शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या दरम्यान घडला. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर वादात होत खूनचा प्रकार घडला. आनंद नगरला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात हा खून झाला. समोरच्या व्यक्तीने रागाच्या भरात अनिल सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची जड कुंडी घातली. यात सावकारे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पिंटू सावकारे यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात गर्दी केली होती. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे भुसावळमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.








