Explosions in Tehran: इस्त्रायल आणि इराणचा संघर्ष पुन्हा तापला आहे. अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आहे. मध्य पूर्वेत अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे.
तेहरानच्या युनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जोमहोरी भागात अनेक क्षेपणास्त्रे पडली, तर तेहरानच्या मध्यभागी पाश्चर स्ट्रीटवरून दाट धुराचे लोट उठताना दिसत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांचा हवाला देत, रॉयटर्सने दिलं आहे.
इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलने आणीबाणीची स्थिती जाहीर केली. गेल्या काही मिनिटांत, इस्रायलमध्ये सायरन वाजले आणि सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्यासाठी सेल्युलर उपकरणांना प्रगत सूचना देण्यात आल्या. इस्रायलकडे क्षेपणास्त्रे डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. आयडीएफने लोकांना सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्याचे आवाहन केले आहे. तर कतारमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत.
इस्रायलने हवाई क्षेत्र बंद केले
या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर इस्रायलने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. इस्त्रायलचे वाहतूक मंत्री मिरी रेगेव्ह यांनी याबाबत घोणणा केली. त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव, नागरी उड्डाणांसाठी इस्रायली हवाई क्षेत्र बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, सुरक्षा परिस्थिती सामान्य होताच हवाई क्षेत्र पुन्हा सुरू केले जाईल आणि इस्रायलला आणि येथून येणाऱ्या उड्डाणे पुन्हा सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.









