Varangaon Municipal Corporation : वरणगाव नगरपरिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 36 कोटीचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पात 29 लाख 33 हजार 655 शिल्लक दाखविण्यात आली आहे. शिलकेचा हा अर्थसंकल्प शुक्रवार, 27 रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. शिलकीचा अर्थसंकल्प सादर केल्याने वरणगाव शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे श्री नागेश्वर पर्यटन विविध सोयीसुविधांसाठी पहिल्यांदा शासनाच्या अनुदान योजनेतून 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विकास निधी तसेस दिव्यांग कल्याण निधी 5 टक्कयांवरुन 7 टक्के इतका करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर योजना अंतर्गत वरणगाव शहर मल निस्सारण प्रकल्प तथा भुयारी गटार योजनेकरिता 84 कोटी, वरणगाव शहर रस्ते विकास अनुदान 5 कोटी, भोगावती नदी तट संवर्धन प्रकल्प अहवाला करिता 0.7 कोटींची तरतूद करण्यात आली असून या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ व दरवाढ करण्यात आलेली नाही.
सुमारे 1 ते 2 कोटी रुपये इतके देणे बाकी असूनही हा अर्थसंकल्प वरणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सोयीसुविधासाठी सक्षम ठरवू असा विश्वास नगराध्यक्ष सुनिल रमेश काळे यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पीय बैठकीस लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल काळे अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष अरूणाबाई इंगळे, भाजप गटनेते दिपाली माळी, शिवसेना गटनेता तृप्ती महाजन, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरीसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी करवाढ न करता विकासकामांना गती देणे आणि पालिकेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे, असे स्पष्ट केले. मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल संतोष गुजरे, कार्यालयीन अधीक्षक रशिद नौरंगाबादी यांनी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष
पालिकेची आर्थिक स्वयंपूर्णत: साधण्यासाठी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चात कपात करणे व काटकसरीची अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढ यावर सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा झाली.
महिला व दिव्यांगांसाठी प्रशिक्षण : महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘महिला व बालकल्याण निधीतून आरोग्य मेळावे, समुपदेशन शिबिरे, स्वसंरक्षण प्रशिक्षण यांचे आयोजन करणता यावे, दिव्यांग बांधवांना कायमस्वरूपी उपजीविकेच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशिक्षण, उपचार सुविधा व स्वतंत्र कल्याण केंद्र स्थापन करण्याची तरतूद व्हावी असे विषय नगरसेवकांनी मांडले.








