Amalner News: अमळनेर–धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ हॉटेल वृंदावन परिसरात मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. मोटारसायकल, बलेनो कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या विचित्र अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरात मधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला असून मालपूर येथील मोटर सायकल स्वार व त्याची मामे बहीण यांचा जागीच मृत्यू झाला आहे.(Amalner Accident)
असा झाला अपघात
मिळालेली माहिती अशी की, अमळनेर आगारातून धुळ्याकडे जाणारी अमळनेर–धुळे–चाळीसगाव मार्गावरील एसटी बस (एमएच 13 सीयू 7540) मंगळवारी सकाळी सुमारे 6.24 वाजता मंगरूळजवळ पोहोचली असता समोरून येणाऱ्या मोटारसायकल (एमएच 18 सी 8719) आणि बलेनो कार (जीजे 19 एएफ 3147) यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेच्या तीव्रतेमुळे मोटारसायकलवरील दोघे जण हवेत उडून बसला धडकले व रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्याचवेळी कारचे नियंत्रण सुटून तिचाही भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत मोटारसायकलवरील दोघांसह कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अमळनेरला येत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रामस्थ, पोलीस धावले मदतीला
घटनेची माहिती मिळताच पोलिस, 108 रुग्णवाहिका कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. कारमध्ये अडकलेल्या एका मुलाला ग्रामस्थ, पोलिस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या भीषण दुर्घटनेमुळे अमळनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अपघातग्रस्त गुजरात मधून साखरपुड्यासाठी येत होते
साखरपुड्यासाठी अमळनेर येथे येत असलेल्या कुटुंबावर काळाचा घातला. त्यात नंदलाल गोपाल माळी (वय.६१ )निर्मला नंदलाल माळी (वय.५५), सुरेश विक्रम माळी (५५), अनिता सुरेश माळी (४९) (रा.अंबाप्रिंप्री ता.पारोळा हल्ली मुक्काम व्यारा) हे सर्वजण अमळनेर येथे आयोजित साखरपुडा समारंभासाठी येत होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घालत आनंदाच्या प्रवासाचे दुःखात रूपांतर झाले. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. अमळनेर मधील माळीवाडा, आंबा प्रिंप्री व गुजरातमधील व्यारा गावावर शोक काळा पसरली आहे. तसेच मोटर सायकल स्वार निलेश सुखदेव तावडे (वय ,२५ रा. मालपुर , दोंडाईचा) फाल्गुनी एकनाथ भोई (वय २२, रा. भोईवाडा, धरणगाव)हे मयत झाले आहेत.
अपघातात कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन (रा. व्यारा, गुजरात) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
‘एसटी’मधील काही प्रवासी जखमी
या एसटी बस मधील बस चालक तसेच दीपक दिलीप पाटील यासह काही प्रवासी जखमी झाले आहेत . त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन (रा. व्यारा, गुजरात) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.









