होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा समिती अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार

On: June 14, 2026 6:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: सोने कर्जामध्ये तारण ठेवलेले सोने सोडवून दागिने मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात जळगाव कृउबा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, फिर्यादी कृष्णा भगवान शिंदे (रा. रामचंद्र नगर, जळगाव) हे जोशीपेठेतील कालभैरव मंदिराजवळ “ओम ज्वेलर्स” नावाने सराफा व्यवसाय करतात. तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी ओम महाजन याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ४ जून रोजी ओम महाजन याने फोन करून बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. ते सोडवून दागिने मोडायचे असल्याने पैसे देण्याची विनंती त्याने केली.

ओम महाजन याने तत्कालीन बँक व्यवस्थापक सुरेंद्र खंडेलवाल यांचे नाव सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिन्यांचे फोटो पाठवत व्यवहारासाठी संपर्क वाढवला. ५ जून रोजी तो शिंदे यांच्या दुकानात आला आणि तातडीने १९ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सोने कारागीर चेतन दुसाने यांच्या माध्यमातून शेजारील सराफा व्यावसायिक यांच्याकडून तात्पुरती १९ लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली.

६ जून रोजी शिंदे, चेतन दुसाने आणि ओम महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्याने ही रक्कम गोल्ड लोन खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. मात्र तांत्रिक अडचणी, केवायसी नसणे, खाते सीझ होणे अशा विविध कारणांचा आधार घेत व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर कोटक महिंद्रा बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तरीही पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यान, ओम महाजन याने वेळकाढूपणा करत सोमवारी किंवा मंगळवारी रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले.

८ जून रोजी ओम महाजन याने शिंदे यांच्या खात्यात ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याबाबत वारंवार आश्वासने देत राहिला. मात्र पुढे त्याने फोन उचलणे बंद केले. फसवणुकीची शंका आल्याने शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओम महाजनचे वडील तथा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय महाजन यांची भेट घेतली. त्यांनी मुलगा घरी नसल्याचे सांगत त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

अखेर ओम महाजन याने ना दागिने दिले, ना संपूर्ण रक्कम परत केली. त्यामुळे आपली १८ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ओम महाजन यांच्या या आधीही काहींना फसवल्याची चर्चा होती. मात्र तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नव्हते, त्यामुळे ओम महाजन याचे अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment