होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तीन वर्षात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र; रेल्वे पायाभूत विकासाबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ‘ते’ जाणून घ्या

On: July 13, 2026 4:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Nagpur News: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून, रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रस्ता उड्डाण पूल तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड [महारेल] यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी २१ हजार मृत्यू

रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, त्यापैकी १० हजारपेक्षा जास्त दळणवळण असलेल्या १२१ फाटकांसोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलांच्या बांधकामांना मान्यता दिली असून, हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षांत महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामासाठी महारेलची स्थापना केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच वापर

नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्ध काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेलने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, यासाठी पेटंटसुद्धा मिळविले आहे. कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

नागपूरच्या विकासाला चालना

नागपूर शहराच्या तसेच रस्त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विकास होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हरब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मेट्रोमुळे गौरव: नितीन गडकरी

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाण पुलासोबतच येथील व्यावसायिकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयांच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयांचा निधी एनएचएआयतर्फे देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पूर्व नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या असून, कचऱ्यापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे. महारेलतर्फे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, ती अत्यंत जलद गतीने पूर्ण होत आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील तीन रोड ओव्हरब्रिज, ४ सबवे आणि एक रोड अंडरब्रिज या प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांवर ४८४ कोटी रुपये खर्च झाला असून, नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधांतर्गत पूर्ण करण्यात आले आहेत. सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ५०: ५० खर्च वाटपाच्या तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहेत. जितेंद्रकुमार शर्मा यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment