होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश काढून कोट्यवधींची फसवणूक; कुंभमेळा मंत्र्यांचा गौप्यस्फोट

On: August 11, 2026 12:35 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश देऊन आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव आणि ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी असलेले बनावट कार्यारंभ आदेश तयार करून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. असा गौप्यस्फोट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल १० ऑगस्ट रोजी जळगावच्या नियोजन भवन येथील पत्रकार परिषदेत केला.

कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त नाशिक शहर तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि अन्य साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक आदेशाची रक्कम १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचेही सांगण्यात येते.

नेमके काय प्रकरण

कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रत्यक्षात ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा नव्हती. तरीही संशयितांनी संबंधितांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे पैसे उकळून त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश दिले. हे आदेश शासनाच्या अधिकृत कार्यारंभ आदेशांसारखेच तयार करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. विशेषतः अधिकृत कार्यारंभ आदेशावर क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा प्रकारे नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये गेडाम यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात दिसून आले.

संशयित जामनेर-धुळ्यातील

दरम्यान या प्रकारासंदर्भात चार ते पाच जण नुकतेच आपल्याकडे आले व त्यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. सध्या त्यांच्याकडे चार बनावट कार्यारंभ आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे आदेश असल्याची माहिती असून, त्याद्वारे संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या प्रकरणातील संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावाही महाजन यांनी केला. याशिवाय आणखी काही व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ना. महाजन सांगितले.या गंभीर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महसूल आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा केल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. बनावट कार्यारंभ आदेश तयार करून शासनाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, संशयितांनविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दळायचे महाजन म्हणाले.

तिघांवर यापूर्वीच गुन्हे

यापूर्वी ही अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे, मुंबईतील तीन जणांनी बनावट कार्यारंभ आदेशाद्वारे काही व्यक्तींची फसवणूक केली होती. त्यांच्या विरोधात आता पुन्हा अशाच पद्धतीने बनावट आदेश देऊन फसवणूक केल्याचे समोर आल्याने हे प्रकरण अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट होत आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये मुंबईसह छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

असे प्रकार असतील तर यंत्रणांकडून पडताळणी करून घ्या

दरम्यान या [प्रकरणात काही शासकीय अधिकारी कर्मचारी असण्याची शक्यता असलयाचे सांगितले. कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली कोणीही परस्पर पैसे देऊन कार्यारंभ आदेश घेऊ नयेत, असे स्पष्ट केले. अधिकृत निविदा प्रक्रिया आणि शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही आदेशावर विश्वास ठेवू नये, ज्या व्यक्तींची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment