Nashik News: (NIC) ‘एनआयसी’च्या e-POS मशीनवर इंटरनेट सर्व्हर सेवा काही महिन्यांपासून सततच्या तांत्रिक अडचणींच्या फेऱ्यात सापडली असून परवानाधारक आणि लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप किपर्सच्या राज्य फेडरेशनच्यावतीने राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ७ सप्टेंबर रोजी दिवसभर e-POS मशीन संपूर्ण वितरण व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील आणि कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांना एक दिवस ई-पॉस मशीन बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मशीनला वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच नाशिक जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी सांगितले.
२१ ऑगस्टला संबंधित प्रशासनास लेखी निवेदन
दरम्यान कापसे म्हणाले की, याबाबत संबंधित प्रशासनास दरमहा वारंवार कळवूनही त्यात काहीही सुधारणा होत नसल्याने राज्य फेडरेशनच्या वतीने शासनास लेखी स्वरुपात सांगण्यात आले होते. दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्य फेडरेशनचे शिष्टमंडळ मुंबई मंत्रालयात जाऊन संबंधित प्रशासकीय विभागाला लेखी स्वरुपात निवेदन देऊन चर्चाही केली. मात्र, याबाबत आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. याकरीता संपूर्ण राज्यातील जिल्हा, शहर, तालुका व ग्रामीण भागातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक आपल्या दुकानातील e-POS मशीन ७ सप्टेंबर रोजी दिवसभर बंद ठेवणार आहे.

शासनाचे लक्ष वेधण्याकरीता हे बंदचे आवाहन राज्य फेडरेशनने केले असल्याचे कापसे म्हणाले. दरम्यान फेडरेशनच्या वतीने संपूर्ण राज्यातील जिल्हा, शहर, तालुका संघटनेचे पदाधिकारी तसेच परवानाधारकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेच्या सदस्यांना करण्यात आले आहे.








