Jammu Kashmir Operation Ashdar: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन अशदार’दरम्यान सुरक्षादलाने लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर याला ठार केले आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली. यासिर हा पाकिस्तानी नागरिक असून, तो लष्कर-ए-तैयबाच्या सुलेमान मूसा गटाशी संबंधित होता.

जम्मू-कश्मीर पोलिसांनी ‘ऑपरेशन अशदार’अंतर्गत केलेल्या कारवाईत यासिरचा खात्मा केला. ‘ऑपरेशन अशदार’ची सुरुवात गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी, बडगाम जिल्ह्यातील अशदार गली परिसरातील दुर्गम डोंगराळ आणि घनदाट जंगलात करण्यात आली. भारतीय लष्कराच्या चिनार कोर, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या SOG आणि CRPFच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये, “तुम्ही पळून जाऊ शकता, पण लपून राहू शकत नाही,” असा संदेश देत यासिरची ओळख लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी म्हणून केली. यासिर यूसमर्ग परिसरात लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर म्हणून सक्रिय होता. सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींवर गेल्या काही काळापासून लक्ष ठेवून होत्या.
दरम्यान, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा एक संशयित गट पीर पंजाल पर्वतरांगांमधील उंच डोंगरवाटांमधून पखेरपोरा (पुलवामा) येथून यूसमर्ग (बडगाम)च्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर ठार झाला. चकमकीनंतर घटनास्थळावरून AK-सीरीजची असॉल्ट रायफल, मॅगझिन, मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि इतर संशयित युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.
जंगल परिसरात शोधमोहीम
यासिर ठार झाल्यानंतरही सुरक्षा दलांनी परिसरातील शोधमोहीम थांबवलेली नाही. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात आणखी दहशतवादी किंवा संशयित लपून बसले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.










