Nashik News: रस्त्यांच्या कामावरून महापालिका प्रशासनावर मोठी टीका होत असतांनाच मनपाच्या रस्ते विकासकामांच्या तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञ पथकाने नाशिक शहरातील तीन प्रमुख काँक्रिट रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्यांची प्रत्यक्ष स्थिती तपासण्यासोबतच काँक्रिट रस्त्याचा कोअर कट घेऊन प्रत्यक्ष जाडीची व इतर प्राथमिक तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन कुंभमेळा स्थळांना जोडणारा त्र्यंबकरोड खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नल, आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला आणि गरवारे ते एक्सएलओ पॉइंट या तीन रस्त्यांचा समावेश होता. रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती, काँक्रिटची गुणवत्ता तसेच बांधकामामध्ये निर्धारित तांत्रिक बाबींचे पालन झाले आहे किंवा नाही, याबाबत तज्ज्ञ पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान निवडक ठिकाणी कोअर कट घेण्यात आले, जेणेकरून रस्त्याच्या आतील भागातील काँक्रिटच्या थराची पाहणी करण्यात आली व प्रत्यक्ष जाडी मोजण्यात आली. या प्राथमिक तपासणीनुसार कोअरची जाडी व इतर प्राथमिक तांत्रिक निकष निर्धारित तांत्रिक मानकांनुसार योग्य असल्याचे दिसून आले. याशिवाय इतर काम सुरू असलेल्या प्रत्यक्ष ठिकाणी देखील पाहणी करण्यात आली, काही तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, सध्याचा पावसाळा ऋतू नाशिक परिसरात सुरू असलेला पाऊस, पावसाळी पाण्याचा निचरा, वाहतूक नियोजन आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून करण्यात आलेली ही पाहणी रस्ते बांधकामाच्या प्रत्यक्ष गुणवत्तेचे तांत्रिक मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. रस्त्यांच्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी, कोअर कटद्वारे रस्त्याची पडताळणी आणि आवश्यक गुणवत्ता चाचणी अहवाल याद्वारे बांधकामाच्या विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेकडून रस्ते कामांच्या गुणवत्तेसाठी अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेसोबतच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणीची कार्यपद्धतीही अवलंबली जाते. त्याचबरोबर स्वतंत्र तांत्रिक संस्थांच्या माध्यमातून कामांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान महानगरपालिकेचे अभियंता नितीन पाटील आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, रवींद्र पाटील, निलेश साळी, हेमंत नांदुर्डीकर आदी उपस्थित होते.








