Jalgaon News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांंच्या समान काम, समान वेतन या न्याय्य मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
मंत्री महाजन यांच्याशी सकारात्मक चर्चा
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी निवेदनाचे अवलोकन करून आवश्यक सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये अनुक्रमांक 6 वर आपल्या मागणीचे निवेदन व नोटशीट समाविष्ट करून ठेवण्यात आली, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. यानंतर महासंघातर्फे मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
आ. मंगेश चव्हाण यांना निवेदन
तसेच या कार्यक्रमादरम्यान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनाही विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आपल्या मागणीबाबत मुख्यमंत्री महोदयांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची विनंती केली असता, त्यांनी निवेदन स्वीकारून त्यावर सविस्तर चर्चा करीत आपल्या मागण्यांसाठी नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी मुंबई येथून महासंघाचे पदाधिकारी संजय शेलार, राजेंद्र पाटील, लघुलेखक संघटनेचे महेश चव्हाण, नाशिक येथून बेलीफ संघटनेचे सचिव सुनील पटेल, जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्याम शिंदे, सहसचिव अतुल भालेराव, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष योगेश सोनवणे, प्रकाश सपकाळ, बेलीफ संघटनेचे अध्यक्ष सुजित चंदनकर, चतुर्थश्रेणी संघटनेचे विभाग प्रमुख गणेश पोळ आदी उपस्थित होते.
प्रत्येक स्तरावर पाठपुरावा सुरू
समान काम समान वेतन या आपल्या मागणीसाठी प्रत्येक स्तरावर संघटनेचा पाठपुरावा आणि लढा सुरु आहे, विजय निश्चित आहे, असे जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.








