Dhule News: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची धडक कारवाई सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठी कारवाई करत 4 ट्रक पनीर-खवा जप्त करण्यात आला होता. आता, धुळ्यात एका लक्झरी बमधून वाहतूक करण्यात येत असलेला 16 लाख 52 हजार रुपये किंमतीचा खवा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विविध वाहनांची तपासणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (FDA )अन्न व औषध प्रशासन आणि धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने मोराणे हद्दीत कारवाई करण्यात आली. साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ ही बस थांबवून तपासणी असता बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात खवा आढळून आला. त्यानंतर कारवाई करत हे वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आले. या तपासणीत साठ्यातील विविध 13 प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने पथकाने गोळा केले. त्यात प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदि), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझल्ट (नंदि), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), आणि प्रीमियम डेझल्ट (मीरा) आदी पदार्थांचा समावेश होता.
अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या अशोक लेलँड वेलकम लक्झरी बस क्रमांक (एमपी -44-झेडई-7214) मधून मिठाई निर्मितीसाठी लागणाऱ्या माव्याची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी प्रशासनाला मिळाली होती. त्यांनतर एफडीएने धुळे तालुका पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करत लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला 5 हजार 385 किलो खवा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे 16 लाख 52 हजार आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.









